Vivekanand Vidyalaya

गुरुपौर्णिमा उत्सव

विवेकानंद विद्यालय यवतमाळ येथे बुधवार दिनांक 13 /7/ 2022 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक सौ जोशी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम वर्ग प्रमुख व उपवर्ग प्रमुख  यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन शिक्षकांचे विधिवत पूजन केले,
आदरणीय पर्यवेक्षक सौ जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ‘गुरु पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूचे अवतार वेद व्यासजी यांचा जन्म झाला होता. महर्षी वेद व्यासजी यांना प्रथम गुरु ही पदवी दिली जाते, कारण गुरु व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते. या तिथीला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आज १३ जुलै २०२२, बुधवार गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जात आहे. गुरु पौर्णिमेला, जगतगुरु वेद व्यास यांच्यासह लोक आपल्या गुरूंची सेवा आणि पूजा करतात.
सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, शैक्षणिक ज्ञान, अध्यात्म आणि साधनेचा विस्तार करणे आणि ते प्रत्येक मानवासाठी सुलभ व्हावे या उद्देशाने गुरु-शिष्य परंपरेचा जन्म झाला. जो शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवाच्याही वरचे आहे. या दिवशी केवळ गुरूच नव्हे तर कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांना गुरू मानून त्यांचा आदर केला पाहिजे. गुरुंच्या सन्मानार्थ हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे संचलन व आभार, प्रभारी शिक्षक श्री संतोष पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रभारी शिक्षिका चौधरी मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले,

विवेकानंद विद्यालयात शालेय प्रवोत्सव साजरा

दिनांक २९/६/२०२२ रोजी विवेकानंद विद्यालयाचा सत्र २०२२ - २०२३ चा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालक सौ. सुषमा दाते, विजय कासलीकर, शालेय समिती सदस्य चंद्रकांत रानडे, शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी तसेच माजी विद्यार्थी अजय सक्रावत, राजेश अमरावत, हरी दोडशेटवार, प्रशांत पोहनकर, अनुज सबनीस, सुनील जोशी, वासुदेव विधाते, मेघा भास्करवार, संजय वंजारी, संजय काकाणी, चंद्रशेखर पाठक, डॉ. वैशाली डोहे, महेश दहिवलकर व अजय दहिवलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वासुदेव विधाते, डॉ. वैशाली डोहे व मेघा भास्करवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना या शाळेत येऊन आपण पुन्हा नव्याने ऊर्जा घेत आहोत असे म्हटले. विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आम्हाला कायम अभिमान वाटत आला आहे. या शाळेने आम्हाला शिस्तीचे आणि संस्काराचे धडे दिले असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वही, पेन इत्यादी शालेय साहित्याचे ही वितरण यावेळी करण्यात आले.
शाळेची शिस्त अंगी बांधण्यासोबतच या संपूर्ण आनंददायी वातावरणाचा आणि सहध्यायी मित्रांसोबत सहजीवनाचा आनंद अनुभवा, असे प्रतिपादन विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी केले.
यानंतर माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ई- क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा इत्यादी अत्याधुनिक सुविधायुक्त वर्गखोल्या दाखवण्यात आल्या. शाळेकरिता आपण कायम सहकार्य करत राहू अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

२०२१-२२ शालान्त परीक्षेचा विवेकानंद विद्यालयाचा निकाल 93.86 टक्के

दिनांक १७ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या दहाव्या वर्गाच्या लागलेल्या ऑनलाइन निकालात येथील विशुद्ध विद्यालय संचालित विवेकानंद विद्यालयाचा निकाल 93.86 टक्के इतका लागला.
शाळेतील 163 विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली. त्यापैकी 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामधील प्राविण्य श्रेणी 21 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 42 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 72 विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत 18 विद्यार्थी आहेत.
85 टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्यांमध्ये सुशांत अनंत लोखंडे (95%), तुषार अनिल ढवळे (91.40%), तेजस सुरेश जाधव (87.40%), ओंकार संदीप मानगावकर (85.80%) व हरीश हुशण्णा परदेशवार (85.80%), भुवन लव चव्हाण (85.20%) यांचा समावेश आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष विद्याताई केळकर, सचिव सतीश फाटक, सहसचिव शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमा दाते, संचालक तथा समन्वयक विजय कासलीकर यांच्यासह विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी तसेच सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सुशांत लोखंडे
९५ %
प्रथम क्रमांक

तुषार ढवळे
९१.४० %
द्वितीय क्रमांक

तेजस जाधव
८७.४० %
तृतीय क्रमांक

विवेकानंद विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

दिनांक 30/04/2022 शनिवार रोजी विवेकानंद विद्यालय, यवतमाळ येथे "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती” साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंतांच्या जीवनावर  बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे यांनी" राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनाबद्दल  बद्दल थोडक्यात माहिती दिली.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली अमरावती जिल्ह्यातील 'यावली' या गावी झाला. वडील वारकरी होते. अडकोजी महाराजांच्या प्रसादा मुळे त्यांचा जन्म झाला असल्याने त्यांचे नाव "तुकड्या" असे ठेवले आणि नंतर जनमानसात ते 'तुकडोजी महाराज' म्हणून ओळखले जाऊ लागले. 1955 मध्ये राष्ट्रसंतांनी "ग्रामगीता" या ग्रंथाची रचना केली. विद्यार्थ्यांना घडण्यासाठी अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. म्हणुनच मुलांनी प्रार्थनेचे महत्व समजुन घेतले पाहिजे असे श्रीमती काळे यांनी  सांगितले.
यावेळी  संगीत विषयाचे श्री खानोदे सर यांनी विद्यार्थ्यांना "या भारतात बंधु भाव नित्य वसु दे, दे वरची असा दे" हे राष्ट्रसंतांचे एक देशभक्तीपर गीत शिकविले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री गहरवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. प्रीती कडू यांनी केले.

राष्ट्रीय पुरस्कार घोषित - ऋषिकेश काकडेचा विवेकानंद विद्यालयात सत्कार

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात ऋषिकेश प्रशांत काकडे या विद्यार्थ्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेत सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
ऋषिकेशला सन २०२१ चा 'डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रेन क्रियेटीव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड' जाहिर झाला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या १५ ऑक्टोबर या जयंतीदिनी तो जाहिर केला जातो. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रियेटीव्ह, इनोव्हेटीव्ह, टेक्निकल आयडियासाठी हनी बी नेटवर्क, एसआरआयएसटीआय आणि जीआयएएन या संस्थांतर्फे  दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरिता यंदा संपूर्ण भारतातून ४२०० संकल्पना आल्या होत्या. त्यामधून १२ मुलांची निवड झाली. त्यातील ११ विद्यार्थी नववीपुढील होते. विवेकानंद विद्यालयात शिकणारा ऋषिकेश हा एकटाच वर्ग ७ वीचा आणि महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. कचरा निर्मूलन व व्यवस्थापनासाठी त्याने सुचविलेल्या कल्पनेसाठी त्याला हा पुरस्कार घोषित झाला.
ऋषिकेशच्या या यशाबद्दल त्याचा बुधवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी विवेकानंद विद्यालय, यवतमाळ तर्फे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायकदादा दाते व सदस्या सुषमा दाते तसेच मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसमोर झालेल्या या कार्यक्रमात ऋषिकेश व त्याच्या वडिलांनी मनोगत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष विनायक दाते व मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी ऋषिकेशचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. संचालन जया बेहरे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.

विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दादा दाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला फाटक, संचालक सौ. सुषमा दाते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे स्वागत विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापक कल्पना पांडे, पर्यवेक्षक प्रशांत  सिंगरू यांनी केले.
विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी प्रास्ताविक तर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दिनेश गहरवार यांनी संचालन केले. यावेळी दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 कोविड -१९ लसीकरण अभियान

कोविड -१९ लसीकरण अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लसीकरण शिबिर राबविण्यात येत आहे. रविवार दिनांक १८ जुलै २०२१ रोजी येथील विवेकानंद विद्यालयात संस्कार भारती व विवेकानंद विद्यालयाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. कोविशिल्डच्या दोन्ही मात्रांचे दोनशे डोज लाभार्थ्यांना देण्यात आले.
या शिबिरास यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय अग्रवाल,  विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सचिव सतीश फाटक, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार, जिल्हाप्रमुख अनंत कौलगीकर, यवतमाळचे अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, जीवन कडू, प्राची बनगीनवार प्रमुख्याने उपस्थित होते. या लसीकरण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हेरंब पुंड, विवेक अलोणी, दिनेश गहरवार, चंद्रशेखर सवाने, संतोष पवार, संजय येवतकर, महेश कोकसे, निलेश पत्तेवार, प्रफुल्ल गावंडे, पूनम नैताम, अनुपमा दीक्षित, सचिन ढोबळे, प्रवीण जिरापुरे, सचिन देशपांडे, सुधीर कानतोडे, दिनेश रणनवरे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आरोग्य विभागाच्या विभागाच्या वतीने अभिषेक खडसे, अर्चना कातोरे, सुनीता किनाके, कांता मेंढे, मेघा पाईकराव व शुभम खडतकर यांनी लसीकरण केले. उपस्थित अधिकारी व वैद्यकीय चमूचे विवेकानंद व संस्कार भारतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या समारंभाचे संचालन विवेक कवठेकर यांनी केले.

शाळेतून प्रथम
शिवम शं. ढेरे
95.40 % गुण

शाळेत द्वितीय
सायली सु.गिरे
94.80% गुण

शाळेत तृतीय
अभिराज प्र. खेलकर
94.20% गुण

शाळेत तृतीय
कन्हैया अ. चौधरी
94.20% गुण

दहावीचा २०२० - २०२१ चा निकाल :- १०० %

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून यावर्षी १७० विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून ८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १७ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले.
शिवम शंकर ढेरे या विद्यार्थ्याने ९५.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. कु. सायली सुधीर गिरे ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर अभिराजन प्रशांत खेलकर व कन्हैया अशोक चौधरी ९४.२० गुण प्राप्त करून तिसरे ठरले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतीश फाटक, संचालक सौ. सुषमा दाते व श्री. विजय कासलीकर, शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक सौ. स्वाती जोशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचेकडून लेसर प्रिंटर भेट

स्थानिक विवेकानंद विद्यालयाला मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-2021 निधीमधून ऑल इन वन लेसर प्रिंटर १३-६-२०२१ रोजी भेट देण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. काळे यांनी ही भेट स्विकारली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचे आभार मानले.

शाळेतून प्रथम
परिणीता विवेकानंद फुलझेले
95.40 % गुण

शाळेत द्वितीय
प्रणव रवींद्र काळे
94.60% गुण

शाळेत तृतीय
प्रसाद राजू बोरकर
93.60% गुण

दहावीचा २०१९ -२०२० चा निकाल :- 98.70 %

यवतमाळ, दिनांक 29 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आज जाहीर झाला. विशुध्द विद्यालय संचलित यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून 155 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 98.70 % इतकी आहे.
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11 असून परिणीता विवेकानंद फुलझेले तिने 95.40 % गुण प्राप्त करील शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. प्रणव रवींद्र काळे हा 94.60% गुणांसह द्वितीय तर प्रसाद राजू बोरकर 93.60% गुणांसह तृतीय स्थानी राहिला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे विशुध्द संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विवेकानंद विद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले असून भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या.

विवेकानंद विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन :

शालेय जीवनातच आपले आयुष्य खऱ्या अर्थाने घडते. ती प्रक्रिया विद्यार्थ्यांना कळत नसली तरी शिक्षक मुलांकडून मेहनत करून घेत असतात. आज विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत सादर केलेले गणिताचे विविध प्रयोग, चित्रकला, रांगोळी इ. कलाप्रकार पाहून मलाच शालेय वातावरणात आल्याचा अनुभव आला. शालेय जीवन खूप छान असते, त्याचा आनंद घ्या, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी येथे केले.
विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर संस्थेचे अध्यक्ष विनायक दादा दाते, संचालक सौ. सुषमा दाते, समन्वयक विजय कासलीकर, पालक शिक्षक संघाचे सहसचिव प्रकाश साबळे, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे, पर्यवेक्षक मारोती जाधव, स्नेहसंमेलन प्रमुख दिनेश गहरवार व जया बेहरे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी पृथ्वी तुरकर, परिणीता फुलझेले, केवल गवई उपस्थित होते.
मुलांनो भरपूर मेहनत करा शिक्षकांना अधिकाधिक प्रश्न विचारा मोबाईल मध्ये गेम खेळण्यापेक्षा मैदानावर खेळ विविध कलाप्रकारात स्वतःला गुंतवून घ्या कारण भारत महासत्ता व्हायचा असेल तर तो मोबाईल खेळण्यातून नव्हे तर सुदृढ तरुण घडण यातून होणार आहे असेही माधुरी बाविस्कर याप्रसंगी म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाध्यक्ष विनायक दादा दाते म्हणाले, शालेय स्नेहसंमेलन हा खूप आनंददायी अनुभव असतो. तो पुन्हा मिळत नाही. त्यामुळे स्नेहसंमेलनाचा आनंद घ्या. प्रदर्शनातील सादरीकरणाबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

विवेकानंद विद्यालयात पालक-शिक्षक संघ गठित 2019-20

शाळा नेहमीच विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवित असते. आधुनिक काळात विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे तत्व रुजणे महत्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छता स्वावलंबन आणि सहकार्याची भावना निर्माण होण्याकरता शाळेने आपल्या परिसरात तर पालकांनी घरी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल-टीव्ही हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा नीट उपयोग करायला शिकवले पाहिजे. त्यामध्ये पालकांचे सहकार्यही तितकेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी विवेकानंद विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या आमसभेत ते बोलत होते.

शाळेचे समन्वयक विजय कासलीकर यांनी याप्रसंगी बोलताना संस्थापक बाबाजी दाते यांनी घालून दिलेला शिस्तीचा वारसा शाळा पुढे चालू ठेवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
संस्थेच्या उपाध्यक्ष तथा महिला बँकेच्या अध्यक्ष विद्याताई केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमा दाते, समन्वयक विजय कसलीकर, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे, पर्यवेक्षक मारुती जाधव, गतवर्षीच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय उपासनी यावेळी मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. संगीत शिक्षक अनिल रेनकुंटलवार व पूर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शारदास्तवन सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मारोती जाधव यांनी केले. पालक शिक्षक संघाची भूमिका विद्यार्थ्यांसोबतच शैक्षणिक क्षेत्राच्याही हिताची कशी आहे हे त्यांनी सांगितले. मागील आमसभेच्या इतिवृत्ताचे वाचन अनुपमा दीक्षित यांनी केले. त्यास सभेने टाळ्यांच्या गजरात संमती दिली.

पालकांच्या विविध सूचनांवर मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे यांनी निवेदन करताना विद्यार्थ्यांच्या वागणुकीशी संबंधित मुद्दे उपस्थित करून सहकार्याची अपेक्षा केली.
नवीन वर्षाकरिता पालक प्रतिनिधी निवडण्यात आले. कार्यकारिणीत मुख्याध्यापक पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष म्हणून मनीषा इंगळे तर सहसचिव म्हणून प्रकाश साबळे या पालकांची निवड झाली.
सभेचे संचालन पालक-शिक्षक संघाचे सचिव संतोष पवार यांनी केले. मीनाक्षी काळे यांनी आभार मानले. यानंतर नव्या कार्यकारणीला संस्थाचालकांनी शुभेच्छा दिल्या.

विवेकानंद विद्यालयात नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात आज 26 जून 2019 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा झाला.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी नव्या सत्राकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. समन्वयक श्री. विजय कासलीकर यांनी माजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री. शैलेश बावडेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. अजय सकरावत व श्री. वासुदेव विधाते यांनी त्यांना या शाळेतून मिळालेल्या उत्तम संस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच नवीन विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावर्षी निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे व प्रयोगशाळा सहाय्यक लक्ष्मण वानखडे यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्याम डगवार, सचिन चौधरी, प्रशांत पोहणकर, हरी दोडशेट्टीवार, प्रेमेंद्र रामपूरकर, संजय काकाणी, उमेश हांडा, राजू देशमुख, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र नार्लावार, सुनील जोशी, राजेश अमरावत, डॉ. चंद्रशेखर देशपांडे, संजय गंडेचा, डॉ. प्रदीप झिलपिलवार, प्रकाश शिदड हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

महेश वासुदेव तोटे
95.60 टक्के गुण
प्रथम क्रमांक

साहिल राजेंद्र निनगुरकर
95.60 टक्के
प्रथम क्रमांक

आनंद सुधाकर येरावार
92.40 टक्के
द्वितीय क्रमांक

अभिषेक विजय मानेकर
90.40 टक्के
तृतीय क्रमांक

Result SSC March 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली. शाळेचा निकाल 81.18 इतका लागला.
शाळेतील महेश वासुदेव तोटे आणि साहिल राजेंद्र निनगुरकर या विद्यार्थ्यांनी 95.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी संस्कृत व गणितात 99 गुण प्राप्त केले.  आनंद सुधाकर येरावारने 92.40 टक्के गुण घेऊन द्वितीय तर अभिषेक विजय मानेकरने 90.40 टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकावले. 8 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. प्रावीण्य श्रेणीत 36 तर प्रथम श्रेणीत 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कलचाचणी समुपदेशन - २ मे २०१९

शालेय शिक्षण घेत असतानाच आपला कल व अभिक्षमता ओळखून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच देशविकासाकरिता व्हावा यादृष्टीने राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी आयोजित केली. डिसेंबर-जानेवारी महिन्यात राज्यभर राबविलेल्या या चाचणीचा निकालही शालांत परीक्षेपूर्वी प्रमाणपत्राद्वारे कळविला. या कल व अभिक्षमतेचा अर्थ विद्यार्थी व पालकांना समजावा यासाठी परीक्षेनंतर २ मे २०१९ रोजी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला.

येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातही वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणी समुपदेशन करण्यात आले. शालेय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापक मोहन केळापुरे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे, तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर बनारसे, दत्तात्रय देशपांडे आणि शिक्षण विभाग गट संसाधन केंद्राच्या कलचाचणी समन्वयक वैशाली गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होत्या.

प्रारंभी दत्तात्रय देशपांडे यांनी प्रास्ताविकातून कलचाचणी व समुपदेशनाचे महत्त्व विशद केले. किशोर बनारसे यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांचा कल तसेच अभियोग्यता विषयक मार्गदर्शन करून निवडक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडविल्या.

संचालन विवेक कवठेकर यांनी केले. आभारप्रदर्शन मीनाक्षी काळे यांनी केले. वैशाली ठाकरे, हेरंब पुंड, विवेक अलोणी यांनी स्वागत केले. यावेळी दहावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी समुपदेशनाबद्दल समाधान व्यक्त केले.

स्नेहसंमेलन २०१८ - १९

यवतमाळ येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोमवारी २८ जानेवारी रोजी संध्याकाळी संपन्न झाले. संस्थेचे सचिव सतीश फाटक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्यास उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते तर अतिथी म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या, प्रवचनकार डॉ. शैलजा रानडे, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा महिला बँकेच्या अध्यक्ष विद्याताई केळकर, सहसचिव शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक अशोक कंचलवार, डॉ. रजनी कंचलवार, शाळेचे मुख्याध्यापक मोहन केळापुरे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे, स्नेहसंमेलन प्रमुख विवेक कवठेकर, देविदास भगत, पूनम नैताम, विद्यार्थी प्रतिनिधी आनंद येरावार व राशी जाधव मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी रांगोळी, डिश डेकोरेशन, दीप सजावट, पुष्प सजावट व विज्ञान प्रदर्शनीचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर झालेल्या मुख्य सोहळ्यात दीप प्रज्वलनानंतर यवतमाळातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते तर महाराष्ट्र शासनाचा संस्कृत शिक्षकांकरिता असलेला कालिदास सन्मान घोषित झाल्याबद्दल डॉ. शैलजा रानडे यांचा सतीश फाटक व विद्याताई केळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिह्न व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. कोलते यांनी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी यवतमाळकरांचे ऋण व्यक्त केले. बाबाजी दाते यांच्या संस्कार व सहवासाने अनेकांची जीवने घडली. आपली दोन्ही मुले विवेकानंद शाळेत शिकूनच मोठी झाली, स्थिरावल्याचे सांगून डॉ. कोलते यांनी शालेय जीवनात साहित्य, संगीत, कला व क्रीडा यांचे महत्त्व विशद केले.
डॉ. शैलजा रानडे यांनी आपल्या भाषणात पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनीही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे असे आवाहन केले. पुरुषोत्तम बोबडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन श्वेता अंबादे व श्रद्धा गोफणे यांनी केले. पूनम नैताम यांनी आभार मानले.
याच कार्यक्रमात 'महाराष्ट्रत्रयींना अभिवादन' हा पुल, गदिमा व बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. संगीत शिक्षक अनिल रेणकुंटलवार व पूर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात राम एकलारे, भाग्यश्री खानोदे, हीना बेहरे, अभया पाटील, ईश्वरी कीर्तीवार व परिणिता फुलझेले यांनी एकाहून एक सरस अशी बहारदार गीतं सादर केली. विवेक कवठेकर यांनी निवेदन केलं. तब्बल अडीच तासपर्यंत चाललेल्या या उद्घाटन सोहळ्यास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आंतरशालेय घोषवादन स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाला द्वितीय पुरस्कार

क्रीडा भारतीच्या वतीने यवतमाळच्या लो. बापूजी अणे विद्यालय प्रांगणात रविवार दि. ०६/०१/२०१९ रोजी घेण्यात आलेल्या आंतरशालेय घोषवादन स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. स्पर्धेत यवतमाळ शहरातील मराठी तथा इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा सहभागी झाल्या होत्या.

विद्यालयाच्या घोषपथकाने या स्पर्धेत 'जयोस्तुते' आणि 'नंदनवन' गीतांचे वादन केले.  क्रीडा भारतीचे पदाधिकारी श्री. सतीश फाटक यांनी विद्यार्थ्यांना स्मृतिचिह्न प्रदान केले. यावेळी क्रीडा शिक्षक प्रफुल्ल गावंडे व मन्साराम सावलकर तसेच स्पर्धेचे परीक्षक अनूप भोयर, सचिन आचार्य व श्याम जोशी उपस्थित होते.

विवेकानंद विद्यालयात बालिका दिवस साजरा

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा करण्यात आला. यवतमाळ पोलिस दलातील दामिनी पथकप्रमुख विजया पंधरे, वाहतूक शाखेतील विजय राठोड आणि दहशतवादविरोधी पथकातील श्री. ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे यांच्या अध्यक्षतेत तसेच पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात वर्ग पाचवीच्या मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका सादर केली. शाळेत मुलांसाठी पोषण आहार तयार करणार्या वंदना राऊत, सपना मेश्राम, अनिता गोरेगावकर यांचा विजया पंधरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख श्री. ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहशतवाद म्हणजे काय ते सांगून परिणामांची माहिती दिली. तर विजय राठोड यांनी रहदारीचे नियम व त्यांचे उल्लंघन केल्यास होणारे परिणाम सांगितले. विजया पंधरे यांनी आपल्या भाषणात दामिनी पथकाचे कार्य स्पष्ट करून मुलांमधील वाढती गुन्हेगारी आणि मुलींची छेड काढल्याने कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागते त्याची जाणीव करून दिली. संचालन संजय येवतकर यांनी केले. मुख्याध्यापक श्री. केळापुरे यांनी आभार मानले.

राज्य भाषा सल्लागार समितीवर यवतमाळचे विवेक कवठेकर

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करणे व त्याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोश तयार करणे या उद्देशाने १९६१ साली महाराष्ट्र शासनाने भाषा सल्लागार मंडळ स्थापन केले होते. प्रशासनिक वापरात भाषा संवर्धन व विकासासाठी भाषा सल्लागार समितीची वेळोवेळी पुनर्रचना करण्यात येते. या समितीवर यवतमाळचे विवेक कवठेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयातील भाषाशिक्षक, 'यशदा'चे प्रशिक्षक मार्गदर्शक, विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून स्तंभलेखन करीत आलेले विवेक कवठेकर यांना १९९८ मध्ये झालेल्या पहिल्या विदर्भस्तरीय 'अक्षर' विद्यार्थी साहित्य संमेलनासह 'अक्षरसाधना' राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून अनुभव आहे. त्यांनी मराठीचे आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर जन्मशताब्दीचे संयोजन तथा स्मृतिग्रंथाच्या संपादनासह साहित्य, संस्कृतीविषयक पुस्तकं आणि शासनाच्या लोकाभिमुख अभियानांच्या पुस्तिकांचे संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना निवड समितीचे अध्यक्ष तसेच संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत सहमहामंत्री असलेल्या कवठेकर यांना रोटरीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त असून एक उत्तम वक्ते, निवेदक, कार्यक्रमांचे आयोजक असा लौकिक आहे. त्यांच्या या निवडीबद्दल यवतमाळचे पालकमंत्री ना. मदन येरावार यांनी अ. भा. साहित्य संमेलन कार्यालयात त्यांचा सत्कार केला. विवेक कवठेकर यांचे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतीश फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, संचालक सौ. सुषमा दाते, समन्वयक श्री. विजय कासलीकर, मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे, पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम बोबडे व शिक्षकवृंदाने अभिनंदन केले आहे.

गणितीय प्रतिकृतीस प्रथम क्रमांक

४४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक प्रतिकृती विभागात विवेकानंद विद्यालय यवतमाळच्या गणित शिक्षिका कु. नीलिमा शेलार यांच्या गणितीय प्रतिकृतीस प्रथम क्रमांक घोषित झाला. फ्री मेथोडिस्ट इंग्लिश मिडियम शाळेत २० व २१ डिसेंबर २०१८ रोजी हे प्रदर्शन झाले. 'आंतरलिखित कोनाचे प्रमेय, चक्रीय चौकोनाचे प्रमेय, त्रिकोणाचे प्रमेय' या भागावरील ही प्रतिकृती जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे.

नीलिमा शेलार यांच्या या यशाबद्दल त्यांचे विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते, सचिव श्री. सतीश फाटक, समन्वयक श्री. विजय कासलीकर , मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे, पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम बोबडे व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

करिअर मार्गदर्शन

विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन दि. ११-१२-२०१८ रोजी घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम बोबडे, प्रा. दिनेश बिसेन  प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक प्रा. राम राठी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करताना दहावी-बारावी नंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी शाखांसह वेगळ्या वाटा कोणत्या ते सांगितले. या वेगळ्या वाटांमध्ये अलीकडे व्यवस्थापन विषयाकडे ओढा वाढला असून त्यासाठी इंग्रजी माध्यमातून वाणिज्य विषय घेण्याकडे कल असल्याचे ते म्हणाले.

विवेकानंद विद्यालय यवतमाळचे खेळाडू राज्यस्तरावर

क्रीडा व युवक संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने सत्र २०१८-१९ मध्ये येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली.
शाळेच्या तीन खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत प्रथम स्थान पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले आहे. अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय वुशू स्पर्धेत १२ वीच्या पूनम अरविंद पाचडे हिने ४० ते ४५ किलो वजनगटात प्रथम स्थान प्राप्त केले.
अकोला येथे झालेल्या विभागीय कराटे स्पर्धेत अखिलेश अंबादे याने १४ वर्षा आतील वयोगटात ५० ते ५५ किलोवजनगटात प्रथम स्थान पटकावले. तर अमरावती शालेय मैदानी स्पर्धांमध्ये १४ वर्षा आतील वयोगटात प्रज्ज्वल धनरे याने २०० व ४०० मीटर धावण्याच्या दोन्ही प्रकारात प्रथम स्थान प्राप्त केले.

15 ऑगष्ट २०१८- स्वातंत्र्यदिन

विशुद्ध विद्यालय द्वारा संचलित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव, शालेय प्रांगणात उत्साहात साजरा झाला. विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, संचालक मंडळाचे सदस्य, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेत एकता हि संगीतमय नाटिका व  पर्यावरणाचे रक्षण करा हा संदेश देणारी नाटिका सादर केली. शांततेचे प्रतिक म्हणून आकाशात कबुतरे उडवली. विद्यार्थ्यांची भाषणे व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.

शालेय कार्यक्रम २०१८ - १९ :- पालक-शिक्षक संघ २०१८-१९

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे ध्येय - श्री. विनायक दादा दाते

शिक्षण, कला, करिअर अशा विविध क्षेत्रात अलीकडे मुलांच्या तुलनेत मुली पुढे दिसतात. शिक्षणसंस्था मात्र सर्वांनाच  समान संधी उपलब्ध करून देत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे ध्येय आहे, असे प्रतिपादन विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दादा दाते यांनी येथे केले.
विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाच्या पालक- शिक्षक संघाच्या आमसभेत ते बोलत होते. संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला फाटक, संचालक सौ. सुषमा दाते, श्री. अशोक कंचलवार, विवेकानंदचे मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे, पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम बोबडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या आमसभेत शाळेचे पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे यांनी प्रास्ताविक केले. सोनाली पडलवार यांनी गतवर्षीच्या आमसभा इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सर्वांनी टाळ्या वाजवून स्वीकृती दिली. गतवर्षीचे सहसचिव रवींद्र काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
विवेक कवठेकर यांनी बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत तर हेरंब पुंड यांनी दीक्षा अॅपबद्दल माहिती दिली. पालकांनी सूचना तसेच शंकांना मुख्याध्यापक श्री. मोहन केळापुरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक तसेच संचालक श्री. अशोक कंचलवार यांनीही मार्गदर्शन केले.
यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नव्या वर्गप्रतिनिधींचे गुलाबपुष्पे देऊन स्वागत करण्यात आले. नव्या वर्षीचे उपाध्यक्ष म्हणून श्री. विजय उपासने आणि सहसचिव म्हणून सौ. संगीता ढेरे यांची निवड करण्यात आली.  संचालन सौ. अनुपमा दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले.

शालेय कार्यक्रम २०१८ - १९

२६ जून २०१८- प्रवेशोत्सव व सामाजिक न्याय दिन

विशुद्ध विद्यालय संस्था द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात २६ जून या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे समन्वयक विजय कासलीकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात मंचावर शाळेचे मुख्याध्यापक मोहन केळापुरे, पर्यवेक्षक पुरुषोत्तम बोबडे, माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी अजय सक्रावत व चंद्रशेखर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
        प्रारंभी सरस्वती, विवेकानंद, राजर्षी शाहू महाराज व बाबाजी दाते यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधीस मोफत पुस्तकांचा संच देण्यात आला. मुख्याध्यापक मोहन केळापुरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून व्यसनांपासून दूर राहण्यास सांगितले. समन्वयक विजय कासलीकर यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून शालेय शिस्त पाळण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थी अजय सक्रावत यांनी शालेय आठवणींना उजाळा देऊन  शाळेसाठी योगदान देण्यास सुचविले.
       यानंतर १९८७ च्या बॅचच्या वतीने नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी शामकांत डगवार, संजय वंजारी, अजय दहिवलकर, प्रकाश शिदड, सुनील जोशी,  प्रशांत पोहनकर, मनीष हलमारे, सचिन कुळकर्णी या माजी विद्यार्थ्यांसह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन संजय येवतकर यांनी तर आभार प्रदर्शन पूनम आत्राम यांनी केले.

२०१७-१८ - दहावीचा निकाल ८४.५० टक्के

प्रथमेश रमेश राठोड
९८.२० %
शाळेत प्रथम

 

कु सुविधा कैलास राठोड
९७.८० %
शाळेत द्वितीय

अथर्व गजानन शाहाकार
९६ %
शाळेत तृतीय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  २०१७-१८ परिक्षेचा जाहीर झालेल्या निकालात यवतमाळ येथील  विवेकानंद विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.  शाळातून परीक्षेस  २००  विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी १६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८४.५० इतकी राहिली.  

९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थींची संख्या ११ इतकी असून प्रथमेश रमेश राठोड याने ९८.२० टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला त्याने सामाजिक शास्त्र व संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. कु सुविधा कैलास राठोड हिने ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळविले. तिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. तर अथर्व गजानन शाहाकार ९६ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिला.

९० टक्के पेक्षा अधिक गुण  - आदित्य संजय इंगोले ९५.४०, अनुज जयंत करोडदेव  ९५.००, तेजपाल राजूसिंग चव्हाण ९४.६०, वैभव भास्कर साठे ९४.४०, सानिध्य मिलिंद कांबळे ९२.६०, कु प्रणाली प्रल्हाद चंद्र ९२.२०, शंतनू सुनील दोंडाल ९१.८०, नचिकेत अरविंद चौधरी ८९.८० टक्के यांचा समावेश राहिला.

शाळेतील ४५ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ४४ विद्यार्थी ६० टक्के पेक्षा अधिक गुण घेत प्रथम श्रेणीत पास झाले , द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थि संख्या ६० राहिली

२०१७-१८ - विवेकानंद उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२९ टक्के

DIKSHA LILADHAR GAIKWAD

KOMAL KISHOR SAWAISHYAM

SUMANT ANANTRAO LOKHANDE

DAMINI VIKAS BIJNOR

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या ३० मे २०१८ रोजी जाहीर झालेल्या निकालात यवतमाळच्या विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.  विद्यालयातून १२ वीच्या परीक्षेस ७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९७.२९ इतकी राहिली.

  • DIKSHA LILADHAR GAIKWAD - FIRST -90.62 %
  • KOMAL KISHOR SAWAISHYAM - SECOND -85.54 %
  • SUMANT ANANTRAO LOKHANDE - SECOND -85.54 %
  • DAMINI VIKAS BIJNOR - THIRD - 85.23 %

विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त विदयार्थी संख्या १४ प्रथम श्रेणीत ३७ तर दुसऱ्या श्रेणीत १९ आणि उत्तीर्ण २ विद्यार्थी आहेत. निकालाची टक्केवारी ९७.२९ इतकी राहिली या उत्कृष्ट निकालाचे सर्वांनी कौतुक केले.

प्रशाले विषयी थोडेसे.....

 विशुद्ध विद्यालय, यवतमाळ द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाची स्थापना १ जुलै, १९६२ ला झाली. शाळा मराठी मिडीयम आहे, गणित व सायन्स इंग्रजीतून शिकविले जाते.  मुले व मुली यांची एकत्र (co-education) शाळा आहे. १०७ विद्यार्थी संख्येवर सुरु झालेल्या विवेकानंद विद्यालयात आज इयत्ता ५ ते १० पर्यंत एकूण १०५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय विभाग (कॉमर्स) मध्ये इयत्ता ११ वि व १२ वि मध्ये एकूण १६१ विद्यार्थी आहेत.

ग्रंथालय : शाळेत उत्तम ग्रंथालय आहे. विद्यार्थी ग्रंथालय पुस्तक संख्या – ८२३ शिक्षक ग्रंथालय पुस्तक संख्या – २१६५

क्रीडा विभाग : विवेकानंद विद्यालयाची क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल परंपरा आहे. दरवर्षी विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थी चमकत आहेत. शाळेत बास्केटबॉल, Vollyball, Throwball, कबड्डी यांचे मैदान आहे. क्रीडा विभागात परिपूर्ण अशी क्रिकेटची कीट, मल्लखांब, जिम्न्यशिअम मेट, घोषवाद्ये इत्यादी साहित्य आहेत.

विज्ञान प्रयोगशाळा : विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळेची स्वतंत्र इमारत असून त्यात भौतिकशास्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे तीन स्वतंत्र विभाग आहेत. इयत्ता ५ ते १० पर्यंतचे विज्ञान विषयात अपेक्षित प्रयोग साहित्य असून विद्यार्थी प्रयोग करीत असतात.

मुख्याध्यापक : श्री. मोहन केळापुरे                  पर्यवेक्षक : श्री. पुरषोत्तम बोबडे

आमसभेत पालक-शिक्षक संघासाठी सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणी तयार करण्यात आली.

अध्यक्ष                   :   श्री. मोहन केळापुरे  (मुख्याध्यापक)
उपाध्यक्ष                 :   सौ. आरती राऊत (पालक)
सचिव                      :  श्री. विवेक कवठेकर (प्रभारी शिक्षक)
सहसचिव               :   श्री. रवीन्द्र काळे
सहसचिव                :  सौ.सोनाली पडलवार (प्रभारी शिक्षिका)

पालक शिक्षक संघ (२०१७-१८) : आमसभा :

शनिवार, दि. १५ जुलै, २०१७ रोजी दुपारी १.०० वा. विवेकानंद विद्यालय, यवतमाळ पालक-शिक्षा संघाची आमसभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी मा. विनायक दाते, अध्यक्ष, विशुद्ध विद्यालय, यवतमाळ होते. दीपप्रज्वलनाने सभेला सुरूवात झाली. एकूण २१३ पालक उपस्थित होते. मागील वर्षीच्या आमसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. शाळेचे माजी शिक्षक सुप्रसिद्ध वक्ते श्री उ. दा. वैद्य यांनी "सुजाण पालकत्व" या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. मुलांची बदलती मानसिकता लक्षात घेण्याचा सल्ला दिला.

पालकांनी शिस्त, पाठ्यपुस्तके, परीक्षा, सहशालेय कार्यक्रम इत्यादी बाबींवर सूचना केल्या. मुख्याध्यापक केलापुरेंनी त्यावर स्पष्टीकरण दिले.

मा. सतीश फाटक ह्यांनी शाळेत केलेल्या सुधारणांची माहिती दिली. अध्यक्षिय भाषणात विनायक दाते  म्हणाले  विद्यार्थी ६ तास शाळेत असतात व १८ तास समाजात वावरत असतात अशावेळी ५०% शिक्षण शाळेत व ५०% शिक्षण शाळे बाहेर मिळत असते. त्या मुळे पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. "सुजाण पालक" हे शाळेचे भांडवल आहे.  

आभार प्रदर्शन श्री. संजय येवतकर यांनी केले.

शालेय समिती २०१६ - १७

 १    श्री सतीश फाटक          अध्यक्ष
२    श्री. मोहन केळापुरे         सचिव
३    श्री मंगेश केळकर          सदस्य
४    श्री चंद्रकांत रानडे          सदस्य
५    श्री जयंत तोताडे             सदस्य
६    श्री रवी काळे                 शिक्षक सदस्य
७    श्री राम दाणी                 शिक्षकेतर सदस्य

गुरुपोर्णिमा - २०१७

विवेकानंद विद्यालयात गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या वेळी १९७७ चे माजी विद्यार्थी विवेक देशपांडे, अश्विन वगारे, माणिक कद्रे, सुषमा गलगलीकर व इतर माजी  विद्यार्थी आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी शाळेतील आपल्या आठवणी सांगितल्या. गुरुपोर्णिमे निमित्त शाळेला योगासनाच्या बैठकीसाठी हिरव्या ५ मॅट भेट दिल्या.

विद्यार्थ्यांच्या  शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगासनाचे वर्ग प्रत्येक शुक्रवारी घेण्यात येणार आहेत.