विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय यांचेतर्फे शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती साजरी

शिक्षणमहर्षी श्रद्धेय बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय शिक्षण संस्थे अंतर्गत सर्व घटक संस्थांचा एकत्रित शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती समारोह यवतमाळ येथे दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते होते. संस्थेच्या उपाध्यक्षा विद्याताई केळकर, सचिव सतीश फाटक, सहसचिव शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, प्रमुख अतिथी डॉ. शैलजा रानडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
संस्थेच्या संचालक सौ. सुषमा दाते, श्री. विजय कासलीकर, डॉ. सौ. रजनी कंचलवार, सौ. मीरा केळकर यांच्यासह वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे प्रा. विवेक देशमुख, डॉ. कल्पना देशमुख, डॉ. हरिदास धुर्वे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कालिदास सन्मान प्राप्त झाल्याबद्दल संस्थेतील माजी प्राध्यापक डॉ. शैलजा रानडे यांचा तसेच आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल अध्यापन पदविका शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत,  डॉ. अचल गुजलवार व बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन तेलखेडे यांचा सत्कार करण्यात आला. अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकल्याबद्दल दाते महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी टिंकल राठोड व अश्विनी खडसे यांनाही सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकांत पर्बत यांनी या संस्थेमुळे आपण घडलो असे म्हटले.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक म्हणाले, बाबाजींनी मोठ्या कष्टाने ही संस्था उभारली. ती पुढे नेताना अधिकाधिक दर्जेदार शिक्षण देणे हीच बाबाजींनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती ठरेल. त्या दृष्टीने पुढील पाच वर्षाचे संस्था नियोजन करीत असल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना डॉ. शैलजा रानडे म्हणाल्या, सूर्य ज्याप्रमाणे जमिनीवरील थोडे पाणी घेतो आणि पावसाचे रुपात अधिक प्रदान करतो तसेच शिक्षकांचेही असते. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे तत्त्वज्ञ हा देशाचा राजा झाल्याचे भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या राष्ट्रपतिपदाच्या रूपाने पाहता आले. राधाकृष्णन् व बाबाजींचा जन्मदिवस एकाच दिवशी येतो, हा दुग्धशर्करा योग होय. बाबाजींनी शिक्षणाचा मार्ग गोरगरीब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श त्यांच्याकडे होते. त्यांचं जीवन संघर्षमय होतं. आव्हानांचे अस्तर लावलेलं बाबाजींचा जीवन आपल्या सगळ्यांना संस्थेसाठी काही करण्याची प्रेरणा देत राहील, असे त्या म्हणाल्या.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी यावेळी बोलताना चांगला गुरू मिळणं ते दुर्मिळ असते, तो मिळाला तर नराचा नारायण आणि वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहत नाही. कुठला मार्ग निवडावा असा संदेह निर्माण झाल्यावर चांगला शिक्षकच मार्गदर्शन करू शकतो. यावेळी दाते महाविद्यालयाच्या प्रतिबिंब अंकाचे विमोचन करण्यात आले. अंकाचे संपादन डॉ. स्मिता शेंडे व  डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. यावेळी राणी लक्ष्मीबाई व विवेकानंद विद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने सरस्वती स्तवन तथा स्वागत गीत सादर झाले. संचालन प्रा. राजेश चव्हाण व सौ. वैशाली ठाकरे यांनी केले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी दाते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुळकर्णी, दाते बीपीएड्चे प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर, विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, राणी लक्ष्मीबाईच्या मुख्याध्यापक डॉ. कल्पना पांडे, पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू, व्यंकटेश विद्यालय घोडखिंडीचे मुख्याध्यापक मुकुंद बावणे, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळवंत सहस्रबुद्धे बाबाजी दाते इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक अस्मिता पळसोकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय यांचेतर्फे शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती साजरी

दिनांक - 5 सप्टेंबर 2020 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक बाबाजी दाते यांच्या जयंतीनिमित्त विशुध्द विद्यालय न्यास व वाणिज्य महाविद्यालय न्यास यांचे संयुक्त विद्यमाने 'शिक्षक दिन’ हा कार्यक्रम संस्थेअंतर्गत येणाऱ्या राणी लक्ष्मीबाई विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते तसेच श्रीमती विदयाताई केळकर, श्री सतीश फाटक, सौ सविता फाटक, श्री मंगेश केळकर तसेच इतर संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविद १९ मुळे साधेपणाने परंतु उत्साहात संपन्न झाला. प्रतिमा पूजनानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी 10 वी 12 वी च्या गुणवत्ताप्राप्त विदयार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक स्वरुपात भेटवस्तू देऊन जाहीर कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे घटक संस्थांमधील पी.एच डी प्राप्त प्राध्यापक डॉ. विवेक देशमुख, डॉ. अमोल राऊत आणि डॉ. प्रशांत बागडे तसेच M.Phil प्राप्त प्राध्यापक श्रीकांत पर्बत व सौ नीता देवतळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. डॉ राजेंद्र क्षीरसागर यांची विद्यापीठात डीन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतातून विदयाताईंनी बाबाजींच्या शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील विवीध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात विनायक दाते यांनी बाबाजींची शिस्त, जिद्द आणि चिकाटी हया गुणांचे प्रत्यय आणून देणारे विविध अनुभव सांगितले.
आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

विशुद्ध विद्यालयाच्या सर्व घटक संस्थांचा संयुक्त शिक्षण दिन १३ सप्टेंबर २०१९ रोजी विवेकानंद महाविद्यालय सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमात  बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दाते शारीरिक  प्रशिक्षण महाविद्यालय, अध्यापन पदविका महविद्यालय, विवेकानंद  राणी लक्ष्मीबाई विद्यालय, ध्रुव प्राथमिक शाळा, व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी, रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मिडीयम स्कूल व बाबाजी दाते इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सचिव सतीश फाटक यांनी प्रास्ताविकातून सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाबद्दल संस्थेची भूमिका विशद केली. बाबाजी दाते हे शिक्षणसम्राट नव्हे तर शिक्षणमहर्षी होते असे ते म्हणाले. या वेळी घटक संस्थातील १६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ स्मृती चिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांचे अध्यक्ष  विनायक दाते यांनी सांगितले की निसर्ग हा पहिला शिक्षक आहे. त्यानंतर आई, वडील व मित्र हे शिक्षक असतात. त्यानंतर शाळेतील व महाविद्यालयातील शिक्षक हे विदयार्थ्यांना घडवतात. बाबाजी दाते हे  खरे हाडाचे शिक्षक होते.  बाबाजी दाते आपल्या विद्यार्थांना समजेपर्यंत शिकवणारे शिक्षक होते.
संथेच्या उपाध्यक्षा विद्या केळकर, सचिव सतीश फाटक, सहसचिव शर्मिला फाटक व कोषाध्यक्ष मंगेश केळकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित  होते. विवेकानंद विद्यालायाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे यांनी सर्वांचे आभार मानले.

विशुद्ध विदयालय संस्थेचा वर्धापनदिन - गुढी पाडव्याला साजरा

विशुद्ध विद्यालय संस्था, यवतमाळ या संस्थेची स्थापना १९५४ साली गुढीपाडव्याला झाली. त्यानिमित्ताने दर वर्षी संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व घटक संस्था सामुहिक गुढीपाडवा उत्सव साजरा करित असतात. यावर्षीचा हा सोहळा अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय, राणाप्रताप नगर यवतमाळ या ठिकाणी शनिवार दि. ६ एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता.
मराठी नववर्षाच्या स्वागताचा हा आनंददायी सोहळा सकाळी ७:३० वाजता सुरू झाला. सर्वप्रथम ध्वजारोहण व ध्वजवंदन झाले. ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती विद्याताई श. केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव मा. सतीश फाटक, कोषाध्यक्ष मा. मंगेश केळकर,  मा. सुषमाताई दाते, मा. अजय पाटणकर, मा. मीराताई केळकर, मा. विजय कासलीकर, मा. रामदास पदमावार, मा. मोहन देव व सर्व घटक संस्थेचे प्रमुख व शिक्षक आणि  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यावर श्रीसुक्त यंत्र व लक्ष्मी देवीची पूजा झाली. त्यानंतर सामुहिक अथर्वशीर्ष, श्रीसुक्त वाचन व आरती झाली. प्रसाद वाटपानंतर परस्परांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मा. श्रीमती विद्या केळकर यांचे अभिनंदन ! श्रीमती सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार २०१८ च्या मानकरी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकर्स असोसिएशनची स्थापना १९३९ मध्ये झाली. या असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातील सहकार चळवळीमध्ये योगदान केलेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो. या वर्षी मा. श्रीमती विद्या केळकर यांनी सहकार चळवळीमध्ये केलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकर्स असोसिएशनने सन २०१८ च्या श्रीमती सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कारासाठी मा. श्रीमती विद्या केळकर, अध्यक्ष, बाबाजी दाते महिला सहकारी बँक, यवतमाळ, यांची निवड केलेली आहे

त्याबद्दल, विशुद्ध विद्यालयातर्फे श्रीमती विद्या केळकर यांचा सत्कार करण्यात आला. विशुद्ध विद्यालयाचे अध्यक्ष यांनी श्रीमती विद्या केळकर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेछा दिल्या.

शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात

विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांचा संयुक्त शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम ५ सप्टेंबर २०१८ रोजी उत्साहात पार पडला. भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.  विशुद्ध संस्थेचे संस्थापक श्रीकृष्ण दत्तात्रेय उपाख्य बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेंबर. या दोन्ही दिनविशेषांच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने दरवर्षी ९ घटक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांचा संयुक्त कार्यक्रम घेतला जातो.
यंदाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा बाबाजी दाते महिला बॅकेच्या  अध्यक्ष सौ. विद्याताई केळकर होत्या. त्यांनी आपल्या भाषणात बाबाजींच्या जीवनात तत्त्वाला किती महत्त्व होतं ते सांगताना संपूर्ण वंदे मातरम्, पसायदान, शिस्त इत्यादी बाबतीतील आग्रह प्रतिपादन केला.
मुख्य अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्वर्ण व्यवसायी श्री. सुरेश कैपिल्यवार होते. बाबाजींच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असल्याने आपल्या व्यावसायिक जीवनालाही उत्तम वळण लागल्याचे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले. संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिह्न देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक यांनी प्रास्ताविकात बाबाजींचा शिक्षणाचा वारसा चालविताना संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
संस्थेच्या वतीने शिक्षक दिना निमित्त बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या  प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक, उप प्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे, पर्यवेक्षक डॉ. सौ. स्वाती जोशी, दाते शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मार्कस लाकडे, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. कैलास बोके, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू, विवेकानंद विद्यालयाचे श्री. देविदास भगत, व्यंकटेश विद्यालयाचे श्री. मारोती जाधव, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बळवंत सहस्रबुद्धे व रामगोपाल बाजोरिया इं. मि. स्कूलच्या मुख्याध्यापक सौ. संगीता मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. चंद्रकांत रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. ज्योती देशपांडे, श्री. मोहन केळापुरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर, प्राचार्य श्रीकांत पर्बत, श्री. मुकुंद बावणे, श्री. पुरुषोत्तम बोबडे, सौ. अस्मिता पळसोकर यांनी स्वागत केले. विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी शारदा स्तवन तर रालविच्या मुलींनी स्वागत गीत म्हटले. प्रा. डॉ. सौ. माणिक मेहरे यांच्या वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

१ ओगस्ट लो. टिळक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 1 ऑगस्ट 2018 रोजी विशुद्ध विद्यालय संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थेच्या घटकसंस्थांचे प्रतिनिधी यांनी आझाद मैदान, यवतमाळ येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या श. केळकर, सचिव श्री. सतीश फाटक, सहसचिव सौ. शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, विशुद्ध विद्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व घटकसंस्थांचे प्रमुख व उपप्रमुख, तसेच श्री. चंद्रकांत रानडे, श्री. विजय कासलीकर, श्री. बलवंत आठवले, प्रा. अनंत पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याला माळ अर्पण केल्यानंतर सर्वांनी मिळून लोकमान्य स्तवन गाऊन या लोकोत्तर पुरूषाला वंदन केले.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेम्बर हा भारतात शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. योगायोगाने विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेम्बर हाच आहे.

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही शिक्षक दिन व श्रध्देय बाबाजी दाते जयंती समारोह हा दाते बी. पी. एड. कॉलेजच्या प्रांगणात साजरा झाला. सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्तास्विक भाषणात संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक यांनी वर्षभरातील संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.

श्री उमेश वैद्य हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ‘बाबाजी म्हणजे संस्काराचे खतपाणी घालणारा उत्तम कास्तकार’ अशा शब्दात त्यांनी बाबाजींचा गौरव केला. उत्तम पीक पाहिजे असेल तर जमिनीची मशागत करावी लागते. पिकांना पोषक खतपाणी घालावे लागते त्याचप्रमाणे माणुसकीच्या पिकाचे आहे. शिस्त, स्वावलंबनाची मशागत करून संस्काराचे खतपाणी द्यावे लागते. बाबाजींनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचले. संस्कारयुक्त शिक्षण हे त्यांचे ध्येय होते, असे श्री. उमेश वैद्य यांनी सांगितले.

विशुध्द विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की शिक्षणप्रक्रिया आयुष्यभर चालणारी आहे. कोणत्याही एका गुरुकडून सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे शक्य नसल्याने आयुष्यात विविध प्रकारचे गुरु करावे लागतात. बुद्धीचे फिल्टर लावून त्या सर्वांकडून काही शिकता येते. अनुभव हाच जीवनातला मोठा शिक्षक आहे.

या प्रसंगी संस्थेच्या प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य व शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.

आभार प्रदर्शन ष्री मंगेश केळकर यांनी केले.