एकविरा माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा प्रचंड उत्साहात :
1500 विद्यार्थी रंगले आनंदमेळा, विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात
आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा
यवतमाळ, येथील विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई व व्यंकटेश विद्यालय या तीन शाळांच्या एकविरा अर्थात एकत्र विवेकानंद राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी शालेय प्रांगणात पार पडले. जवळजवळ चार महिन्यांपासून तयारी सुरू असलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्याकरता आभासी व प्रत्यक्ष नोंदणी करून 1500 माजी विद्यार्थी आले होते. त्यांच्यासाठी शालेय मैदानात मोठा मंडप घातलेला होता. कार्यक्रमस्थळी सकाळी 9 पासून शालेय घोषपथकाने वादन करून व मुलींनी औक्षण करून प्रत्येकाचे स्वागत केले. बरोबर 10 वाजून 55 मिनिटांनी घंटा झाली. 'जयोस्तुते' हे गीत धनिक्षेपकावरून लावण्यात आले आणि 11 च्या ठोक्याला शालेय प्रार्थना प्रारंभ झाली. ध्यानयोगानंतर दिवंगत माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, एकविराच्या सचिव मंगला तांबेकर, 1987 च्या बॅचचे राजेश अमरावत, प्रशांत पोहणकर व अजय सक्रावत, विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, रालविचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी तसेच व्यंकटेश विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्वाती जोशी यांनी दीप प्रज्ज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याकरिता केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले शुभेच्छा संदेश एलईडी स्क्रीनवरून प्रसारण करण्यात आले. मंचावर विशुद्धचे अध्यक्ष विनायक दाते, सचिव विजय कासलीकर, सहसचिव मीरा केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमा दाते व महेश जोशी त्याचप्रमाणे एकविराचे उपाध्यक्ष शशांक देशमुख, सचिव मंगला तांबेकर, सहसचिव विजय देशपांडे, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सदस्य अविनाश वेलंकीवार, अविनाश लोखंडे, भाग्यश्री बापट, शामकांत डगवार, मीनाक्षी काळे व स्वाती जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विनायक दाते यांनी विशुद्ध संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आगामी योजनांबद्दल माहिती दिली. बाबाजी दाते यांनी लोकसहभागातून संस्था उभी केली. आजही लोकसहभागच अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे आगामी विकासकामांकरिता माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकविराच्या सचिव मंगला तांबेकर यांनी यावेळी बोलताना त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन विशुद्ध संस्थेतील आपला कार्यकाळ अतिशय संस्मरणीय ठरल्याचे म्हटले. प्रास्ताविकात एकविराचे उपाध्यक्ष शशांक देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांचे शिक्षण या संस्थेत झाले. इथूनच आपल्याला शिस्त आणि संस्काराचे धडे मिळाले असे सांगून संस्थेसाठी आपणही काही देणे लागतो या भावनेने कार्य करू असे म्हटले.
झी मराठी वाहिनीवर अभंग गायन केलेल्या विवेकानंदाच्या भाग्यश्री खानोदेचे यावेळी कौतुक करण्यात आले. भाग्यश्रीचा भाऊ, तबलावादक प्रज्ज्वल खानोदे आणि वडील संगीत शिक्षक पूर्णाजी खानोदे यांचाही सत्कार करण्यात आला.
दरवर्षी तिन्ही शाळेतील मुलांचा प्रवेशोत्सव साजरा करीत आलेल्या 87 च्या बॅचमधील चंद्रकांत पाठक, वासुदेव विधाते व उमेश हांडा यांचा यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित माजी मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे, नितीन खर्चे, ताराचंद चव्हाण, मोहन केळापुरे, मारोती जाधव, संध्या पिंगळे त्याचप्रमाणे निवृत्त शिक्षक रमाकांत दाभाडकर, कृष्णराव पाचखेडे, ल. रा. वानखडे, देविदास भगत, वसंत पलकंडवार, पुरुषोत्तम रावेकर, आबा पांडे, रमेश रोकडे, वसुधा केळकर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी लक्ष्मण वानखडे, कलावती शिरभाते यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पकुंडी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. सुषमा दाते यांनी संकलित केलेल्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आठवणींची ई- स्मरणिका विमोचित करण्यात आली. रोटरी यवतमाळ मिडटाऊनच्या वतीने 17 गरजू विद्यार्थ्यांना अमित मोर, परेश लाठीवाला, निलेश ढुमे, शशांक देशमुख व तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे संचालन विवेक कवठेकर यांनी केले.
दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी टायर चालवणे, टिकली लावणे, कंचे, रस्सीखेच, पतंगबाजी इत्यादी त्यावेळच्या खेळांचा आनंद लुटला. यवतमाळातील सुप्रसिद्ध बुढीचा चिवडा, गुप्ताजीचा आलूबोंडा इत्यादी पदार्थांचा आनंद मेळासुद्धा या ठिकाणी भरविण्यात आला.
समारोप सत्रामध्ये निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम व्यवस्था उभारल्याबद्दल सुनील भुसार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी व त्यांच्या बॅचेसने आपापल्या परीने शाळेच्या विकासाकरता आर्थिक सहाय्य केले. कार्यक्रमाचे संचालन वासुदेव विधाते तर आभार प्रदर्शन अविनाश लोखंडे यांनी केले.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, नकला, एकपात्री प्रयोग सादर करून धमाल केली. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत चाललेल्या या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक तथा माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.