Teachers’ Day

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेम्बर हा भारतात शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. योगायोगाने विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेम्बर हाच आहे.

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही शिक्षक दिन व श्रध्देय बाबाजी दाते जयंती समारोह हा दाते बी. पी. एड. कॉलेजच्या प्रांगणात साजरा झाला. सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्तास्विक भाषणात संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक यांनी वर्षभरातील संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.

श्री उमेश वैद्य हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ‘बाबाजी म्हणजे संस्काराचे खतपाणी घालणारा उत्तम कास्तकार’ अशा शब्दात त्यांनी बाबाजींचा गौरव केला. उत्तम पीक पाहिजे असेल तर जमिनीची मशागत करावी लागते. पिकांना पोषक खतपाणी घालावे लागते त्याचप्रमाणे माणुसकीच्या पिकाचे आहे. शिस्त, स्वावलंबनाची मशागत करून संस्काराचे खतपाणी द्यावे लागते. बाबाजींनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचले. संस्कारयुक्त शिक्षण हे त्यांचे ध्येय होते, असे श्री. उमेश वैद्य यांनी सांगितले.

विशुध्द विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की शिक्षणप्रक्रिया आयुष्यभर चालणारी आहे. कोणत्याही एका गुरुकडून सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे शक्य नसल्याने आयुष्यात विविध प्रकारचे गुरु करावे लागतात. बुद्धीचे फिल्टर लावून त्या सर्वांकडून काही शिकता येते. अनुभव हाच जीवनातला मोठा शिक्षक आहे.

या प्रसंगी संस्थेच्या प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य व शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.

आभार प्रदर्शन ष्री मंगेश केळकर यांनी केले.

Top